मुंबई । राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत घोषणा केली. त्यानुसार ‘ट्रिगर-1’ लागू झालेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर सरकारने हा निर्णय घेतल्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती आणि मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

265 तालुक्यांमध्ये दुष्काळ
राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ लागू झाल्याचे निकषांवरून निश्चित करण्यात आले. त्यानुसार या सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या भूभागावर दुष्काळाची परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार,जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट), शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवणार, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही, शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार, आदी उपाययोजना फडणवीस यांनी जाहीर केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काय?
दरम्यान, येत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार आहेत. या पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला होता. दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.















Discussion about this post