मुंबई । राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्था, शेतातील मेटल डिटेक्टरचा वापर आणि ‘सोपास्कारांवर’ कडाडून टीका करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने भरीव आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्याच्या पद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. “मुख्यमंत्री महोदय, भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बाँबही पिकवायला लागला का? म्हणून शेतातही मेटल डिटेक्टर लावण्याची वेळ या सरकारवर आली,” असा रोखठोक सवाल करत त्यांनी हे देशातील पहिलेच अजब चित्र असल्याचा आणि बळीराजाचा हा अवमान असल्याचा आरोप केला.

“दुष्काळाची पाहणी शेतात जाऊन करायची असते. मात्र, एका ठिकाणी स्थानिक नेत्यांनी चक्क शेतात टेबल लावून एखाद्या प्रदर्शनात मांडल्याप्रमाणे जळालेली पिकं आणून ठेवली. आधी पोलिसांनी शेतात मेटल डिटेक्टर लावलं आणि आता टेबलावर पिकं ठेवली, अशा नेत्यांवर हसावं की रडावं?” असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पोलीस सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेटीसाठी अडवत आहेत आणि केवळ ‘कडक खादी’ घातलेल्यांनाच सोडले जात आहे, असा आरोप करत त्यांनी हा दौरा शेतकऱ्यांसाठी की पुढाऱ्यांसाठी आहे, असा प्रश्न विचारला.
आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख मागण्या
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपये मदत देण्यात यावी.
मागील वर्षी घोषणा केल्याप्रमाणे १७,५०० रुपये प्रतिहेक्टरी पीकविमा आणि रखडलेला विमा त्वरित मिळवावा. तसेच कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा वेग वाढवून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित द्यावे.
“मुख्यमंत्री साहेब, डिटेक्ट करायचंच असेल तर आज अडचणीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या भावना डिटेक्ट करा,” असे आवाहन त्यांनी सरकारला केले.















Discussion about this post