गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे वाढलेला उकाडा आणि उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिकही हैराण झाले होते. अशातच राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला असून, अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता असून, तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असून, या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही पावसाची शक्यता
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काहीसा दिलासादायक ठरू शकतो.
विदर्भातील आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट
विदर्भातही पावसाचे वातावरण तयार झाले असून, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, पावसासोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडू शकतो.















Discussion about this post