भुसावळ । देशात सणासुदीचे दिवस जवळ येऊ लागताच रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अहमदाबाद–सांतरागाछी–अहमदाबाद विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली असून, या गाडीला खान्देशातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे गुजरात, खान्देश आणि पूर्व भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिरिक्त आणि सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे.

रेल्वे क्रमांक ०२८३३ अहमदाबाद–सांतरागाछी विशेष गाडी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २.२५ वाजता अहमदाबाद स्थानकावरून रवाना होईल. विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सांतरागाछी येथे पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात ०२८३४ सांतरागाछी–अहमदाबाद विशेष गाडी २० सप्टेंबर रोजी पहाटे १२.१५ वाजता सांतरागाछी येथून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.

खान्देशातील नंदुरबार, भुसावळला थांबा
या विशेष रेल्वेला दोन्ही दिशेने आनंद, वडोदरा, भरुच, सुरत, नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर येथे थांबे देण्यात आले आहेत. नंदुरबार आणि भुसावळला थांबा मिळाल्यामुळे खान्देशातील प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे. गुजरातसह मध्य भारत आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे.
एसीसह स्लीपर आणि सामान्य डबे
प्रवाशांच्या सोयीसाठी गाडीत एसी ३ टियर, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गरजेनुसार प्रवासाचे आरक्षण करता येणार आहे. या विशेष गाडीच्या अहमदाबाद–सांतरागाछी दिशेच्या सेवेचे आरक्षण १८ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. प्रवाशांना पीआरएस आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट आरक्षित करता येणार आहे. विशेष गाडी असल्याने तिच्यासाठी लागू असलेले विशेष भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी प्रवाशांनी भाड्याची माहिती तपासणे आवश्यक आहे.
सणासुदीच्या गर्दीत अतिरिक्त पर्याय
सणासुदीच्या काळात गुजरात, खान्देश आणि पूर्व भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. अशा वेळी नियमित गाड्यांवरील गर्दी लक्षात घेता ही विशेष सेवा प्रवाशांसाठी अतिरिक्त पर्याय ठरणार आहे. नंदुरबार आणि भुसावळ येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सेवेचा फायदा घेता येणार आहे.















Discussion about this post