नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय तेल बाजारातून भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाची वाहतूक करणारी तब्बल १२०० किलोमीटर लांबीची पूर्व-पश्चिम पाइपलाइन तात्पुरती बंद केली आहे. ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे जागतिक तेलपुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता असून, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी आधीच मोठी उसळी घेतली आहे. गुरुवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०९ डॉलरपर्यंत पोहोचला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहतुकीवर आधीच परिणाम झालेला असताना सौदीची पर्यायी तेलवाहतूक व्यवस्था देखील अडचणीत आल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
ड्रोन हल्ल्यानंतर पाइपलाइनला फटका
सौदी अरेबियातील रियाध आणि मदिना परिसरात भारतासह आशियाई देशांना तेलपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या भागावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती आहे. मदिनाच्या दक्षिणेकडील पाइपलाइनच्या परिसरातून काळा धूर निघतानाचे दृश्य समोर आले आहे. हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यामुळे पाइपलाइनचे नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, सौदी अरेबिया आणि इराकने हा हल्ला इराकच्या दिशेने झाल्याचे म्हटले आहे. या परिसरात इराणसमर्थित सशस्त्र गट सक्रिय असल्याची माहिती आहे.
भारताच्या तेलपुरवठ्यावर परिणामाची शक्यता
सौदी अरेबिया हा भारतासाठी कच्च्या तेलाचा महत्त्वाचा पुरवठादार आहे. त्यामुळे सौदीकडून होणाऱ्या तेलवाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या आयातीवर होऊ शकतो. आकडेवारीनुसार, सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सौदीकडून भारताला दररोज सुमारे ७ लाख ४३ हजार बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा होत होता. त्यानंतर हा पुरवठा घटून दररोज सुमारे ४ लाख ४० हजार बॅरलवर आला आहे. त्यातच आता पाइपलाइन बंद झाल्याने पुरवठ्याच्या पर्यायी मार्गांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.
होर्मुझनंतर पर्यायी मार्गालाही ब्रेक
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरून तेलवाहतूक प्रभावित झाल्यानंतर सौदी अरेबियाची पूर्व-पश्चिम पाइपलाइन हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरत होता. या पाइपलाइनद्वारे तेल होर्मुझला वळसा घालत पश्चिम किनारपट्टीवरील यान्बू बंदरापर्यंत पोहोचवले जाते आणि तेथून भारतासह अन्य आशियाई देशांना तेलाची निर्यात केली जाते.मात्र, ड्रोन हल्ल्यानंतर हा मार्गही तात्पुरता बंद करण्यात आल्याने जागतिक तेलपुरवठ्याच्या चिंतेत भर पडली आहे. सौदी ऊर्जा मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून पाइपलाइन बंद केल्याचे स्पष्ट केले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम होणार?
कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने १०० डॉलरच्या वर राहिल्यास भारताच्या आयात खर्चावर दबाव वाढू शकतो. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत चिंता वाढली आहे. मात्र, देशांतर्गत इंधनदरांवर नेमका किती परिणाम होईल, हे कच्च्या तेलाच्या किमती किती काळ उच्च पातळीवर राहतात आणि तेलपुरवठा कितपत सुरळीत होतो, यावर अवलंबून असेल.सध्या सौदीची पाइपलाइन तात्पुरती बंद असल्याने तिची दुरुस्ती आणि तेलवाहतूक पुन्हा कधी सुरू होते, याकडे भारतासह जगभरातील तेल बाजाराचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post