जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज १५वा दिवस असून, आता त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना, “प्रत्येक वेळी वेगळी मागणी करण्याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. सनदशीर मार्गानेच या प्रश्नावर तोडगा निघेल,” असे स्पष्ट केले.


गिरीश महाजन म्हणाले की, जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ वेळोवेळी गेले आहे. त्यांच्या मागण्या सरकारने ऐकून घेतल्या असून, १४ पैकी १२ मागण्या मान्यदेखील झाल्या आहेत. प्रत्येक वेळी ते उपोषणाला बसल्यानंतर सरकारने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जात पडताळणी समिती रद्द करण्यासारख्या सनदशीर नसलेल्या मागण्या कशा मान्य करायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“प्रत्येक वेळी वेगळी मागणी आणि कुठेतरी एकाच मुद्द्यावर अडून बसणे योग्य नाही. मागण्यांसंदर्भातही काही मर्यादा असली पाहिजे. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांबद्दल ज्या पद्धतीने भाषा वापरली जात आहे, ती आता थांबली पाहिजे. एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तींना शिव्या देऊन कोणताही मार्ग निघणार नाही. सनदशीर मार्गानेच या सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल,” असे महाजन यांनी म्हटले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
यावर बोलताना गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली. “उपोषणाला १४दिवस झाले असून त्यांनी आता आपली तब्येत सांभाळली पाहिजे. दीर्घकाळ उपोषण केल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम होतो,” असे महाजन यांनी सांगितले.
त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा कायम असताना, दुसरीकडे सरकारकडून सनदशीर मार्गानेच प्रश्न सोडविण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. आता मुंबई आंदोलनाबाबत जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात आणि सरकार त्यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post