पारोळा । पारोळा तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या कारणातून अवघ्या १८ वर्षीय तरुणाची चाकूने पोटात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयुर दुर्वास पाटील (वय १८, रा. पळासखेडे बु.) असे मृत तरुण विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पळासखेडे गावावर मोठी शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अंकुश नेहरू पाटील (रा. पळासखेडे बु.) याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पळासखेडे बु. येथील रहिवाशी मयुर पाटील हा किसन कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए. चे शिक्षण घेत होता गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळासखेडे शिवारालगत असलेल्या रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ मयुर पाटील हा त्याचा चुलत भाऊ संदीप विष्णू पाटील याच्यासोबत गावाकडे येत होता. यादरम्यान, मयुर आणि आरोपी अंकुश पाटील यांच्यात पूर्ववैमनस्य व जुन्या भांडणाच्या कारणावरून पुन्हा वाद उफाळला.
दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे पाहून राजेंद्र ज्ञानेश्वर पाटील, विकास बापू पाटील तसेच मयुरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतापलेल्या अंकुश पाटील याने अचानक आपल्या पँटच्या डाव्या खिशातून धारदार चाकू काढून मयुरच्या पोटात जोरदार वार केला. या प्राणघातक हल्ल्यात मयुर गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.
हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. गंभीर जखमी झालेल्या मयुरला राजेंद्र पाटील व विकास पाटील यांनी तातडीने मोटारसायकलवरून उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मयुरला मृत घोषित केले. या प्रकरणी मयुरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात न्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post