जळगाव । गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा वाढला होता. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता मात्र पावसाच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त दिसून येईल. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच हिंगोली, नांदेड आणि परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
नाशिकचा घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली भागात आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून सुरू होणारा हा पाऊस पुढील ३ दिवस राहण्याची शक्यता आहे. वीकेंडला राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून शेतीकामांनाही वेग येण्याची शक्यता आहे.















Discussion about this post