नंदुरबार : महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत अधूनमधून व्यक्त होणाऱ्या अपेक्षांमध्ये आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. नंदुरबार येथील शिवसेनेच्या मेळाव्यात पाटील यांनी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका मांडली.


मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेला हात घालत आपल्या नेत्याने मोठे झाले पाहिजे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस येतील, असा दावा पाटील यांनी केला.
पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील आगामी राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडे महायुतीतील सर्वाधिक संख्याबळ असले तरी शिवसेनेकडूनही मुख्यमंत्रीपदाबाबतची अपेक्षा कायम असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले.
उद्धव ठाकरे गटावरही निशाणा
यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरही जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाची बदनामी करण्यापासून ते पक्षाचे चिन्ह गोठवण्याच्या मुद्द्यापर्यंत विविध प्रकारे शिंदेंना लक्ष्य केले जात असल्याचे पाटील म्हणाले.
मात्र, न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास असून योग्य निर्णय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नंदुरबारमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये शिवसेनेनेही आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मेळाव्यातून मिळाले. मंत्री उदय सामंत यांनी भविष्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा असावा आणि तो याच व्यासपीठावर बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यामुळे नंदुरबारच्या राजकारणात आगामी काळात भाजप आणि शिवसेनेतील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्रीपदापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेपर्यंत शिवसेनेने आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट झाले.















Discussion about this post