महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या दोन भीषण रस्ते अपघातांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. नांदेड-भोकर मार्गावरील अपघाताची बातमी ताजी असताना भंडारा जिल्ह्यातील नागपूर-रायपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवघ्या २४ तासांत घडलेल्या या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


भंडारा जिल्ह्यातील नागपूर-रायपूर महामार्गावरील पिंपळगाव (सडक) येथील ‘भाऊचा ढाबा’ जवळ आज पहाटेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू ट्रक पेट्रोल पंपावरून महामार्गावर निघत असताना, पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्स वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या भीषण धडकेत ट्रॅक्समधील ८ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने भंडारा येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
छत्तीसगडचे मजूर नागपूरकडे जात असताना काळाचा घाला
वाहनातील सर्व मृत आणि जखमी नागरिक मूळचे छत्तीसगड राज्यातील असून ते मजुरी करून आपले पोट भरत होते. कामाच्या निमित्ताने नागपूरच्या दिशेने जात असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस अधिकारी रवींद्र रेवतकर, स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली.
नांदेडमध्ये पोळ्याच्या दिवशीच ८ जणांचा बळी
याआधी, ऐन पोळ्याच्या दिवशी गुरुवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांसह ८ जणांचा करुण अंत झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सलग दोन दिवस झालेल्या या भीषण अपघातांमुळे राज्यभरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस दोन्ही घटनांचा पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post