भुसावळ । मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील हडपसर-घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हे काम करण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांवर होणार आहे. या काळात काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
या गाड्या राहणार रद्द
ब्लॉकच्या कालावधीत काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १२११४ नागपूर-पुणे (२ ऑक्टोबर), १२११३ पुणे-नागपूर, १२१३६ नागपूर-पुणे, ११०२६ अमरावती-पुणे (३ ऑक्टोबर), १२१३५ पुणे-नागपूर आणि ११०२५ पुणे-अमरावती (४ ऑक्टोबर) या गाड्यांचा समावेश आहे.
त्यामुळे पुणे, नागपूर, अमरावती तसेच भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या गाडीचे वेळापत्रक आणि धावण्याची स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या नियोजित मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने धावणार आहेत. १२२२१ पुणे-हावडा ही गाडी १९ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर रोजी लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळविण्यात येणार आहे. १२२२२ हावडा-पुणे ही गाडी ३ ऑक्टोबर रोजी मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-लोणावळा मार्गे धावणार आहे.
११०७८ जम्मू तवी-पुणे ही गाडी २१ सप्टेंबर रोजी मनमाडमार्गे वळविण्यात येणार आहे. तर १२७८० निजामुद्दीन-वास्को-द-गामा ही गाडी २२ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर रोजी मनमाड-दौंड-कुर्डुवाडी-मिरज मार्गे धावणार आहे.
याशिवाय ११०७७ पुणे-जम्मू तवी ही गाडी २० सप्टेंबर रोजी लोणावळा-पनवेल-मनमाड मार्गे वळविण्यात येणार आहे. १२१३५ पुणे-नागपूर या गाडीच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहे.
काही गाड्यांचा प्रवास अंशतः समाप्त
ब्लॉकच्या काळात काही गाड्यांचा प्रवास पूर्ण पुण्यापर्यंत न जाता मध्येच समाप्त करण्यात येणार आहे. ११०२६ अमरावती-पुणे ही गाडी १९ आणि २२ सप्टेंबर रोजी दौंड स्थानकावरच थांबविण्यात येणार आहे. तर ११०२५ पुणे-अमरावती ही गाडी ३ ऑक्टोबर रोजी पुण्याऐवजी दौंड स्थानकातून सुरू होणार आहे.















Discussion about this post