जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातील खांदेपालट करण्यात आले असून तीन पोलिस निरीक्षकांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यां यासंदर्भातील आदेश जारी केले. या नियुक्त्यांमुळे जामनेर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यांना नवे प्रभारी मिळाले असून, आर्थिक गुन्हे शाखेची धुरा देखील नव्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, रायगड येथून जळगाव जिल्ह्यात हजर झालेले पोलिस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भंडारा येथून जळगावमध्ये रुजू झालेले पोलिस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय पोलिस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित तपासाची जबाबदारी आता त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
प्रशासकीय कारणास्तव नियुक्त्या
महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नव्या पदस्थापनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी विलंब न करता आपल्या नवीन ठिकाणी कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तातडीने रुजू होण्याचे आदेश
नियुक्ती झालेल्या सर्व पोलिस निरीक्षकांनी नवीन पदावर तातडीने हजर होऊन कर्तव्य बजावण्यास सुरुवात करावी. तसेच कार्यभार स्वीकारल्याचा अनुपालन अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.















Discussion about this post