पारोळा : वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातूंवर चोरट्यांची नजर असल्याचा धक्कादायक प्रकार पारोळ्यात उघडकीस आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर म्हसवे गावाजवळ पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त नाकाबंदीमध्ये संशयास्पद वॅगनार कार अडवण्यात आली. वाहनाची झडती घेतल्यानंतर जुन्या मारुती सुझुकी ईको वाहनांचे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी केल्याचा प्रकार समोर आला.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयावरून वॅगनार कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये आसीफ यामीन आणि आरीफ सलीम हे दोघे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता जुन्या मारुती सुझुकी ईको वाहनांचे तीन सायलेंसर अर्थात कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच अंदाजे पाच ते सहा किलो ‘सायलेंसर माती’ आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
मौल्यवान धातूंमुळे ईको वाहनांना लक्ष्य?
कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअम यांसारख्या मौल्यवान धातूंचा वापर केला जातो. या धातूंना बाजारात मोठे आर्थिक मूल्य असल्याने त्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे प्रकार होत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. विशेषतः मारुती सुझुकी ईको वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.
मुंबई-ठाण्यातही चोरी केल्याचा संशय
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मुंबई आणि ठाणे परिसरातही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, या माहितीची अद्याप पडताळणी सुरू आहे. चोरी केलेले कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नेमके कुठे विकले जात होते, त्यातून मिळणाऱ्या पावडरचा पुढे कशासाठी वापर केला जात होता आणि या चोरीच्या मागे आणखी कोणाचे मोठे नेटवर्क आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातूंच्या चोरीचा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रकरणाचा तपास पुढे आणखी कोणते धागेदोरे उघड करतो, याकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post