कोल्हापूर : ईडीच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आपण गंभीर आजारी पडलो. आपल्याला कॅन्सर झाला असून, या आजाराचे मूळ तुरुंगात असतानाच सुरू झाले होते, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. कोल्हापूर येथे आयोजित ‘दिनमान साहित्य उत्सव पर्व २’ मधील प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी राऊत यांची मुलाखत घेतली.
यावेळी राऊत यांनी तपास यंत्रणांच्या कारवाईवरही गंभीर आरोप केले. “ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. मला ईडीने का अटक केली, माझी केस नेमकी काय होती, हे मला आजही माहिती नाही,” असे ते म्हणाले. ईडीच्या कोठडीत असताना आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी यांना पत्रे लिहिली होती. मात्र, ही पत्रे संबंधित नेत्यांपर्यंत पोहोचू दिली गेली नाहीत, असा आरोपही राऊत यांनी केला.
आपल्या अटकेच्या वेळचा एक किस्सा सांगताना राऊत म्हणाले की, “माझ्यावर रेड पडली तेव्हा घरात १२ लाख रुपये सापडले होते. आम्ही त्याच्या चार दिवस आधीच अयोध्येहून आलो होतो. त्या पुडक्यावर ‘उरलेली रक्कम एकनाथ शिंदे यांना द्यायची आहे’, असे स्पष्ट लिहिले होते.” यावेळी राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडत “अंगावर खादी असली तरी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल गुंड आहोत. ईडी आज आहे, उद्या नाही,” असे वक्तव्य केले.
देशाच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. “देशाच्या राजकारणात फक्त ‘मीच राहीन’ ही मोदी आणि शाह यांची भूमिका अत्यंत घातक आहे,” असे राऊत म्हणाले. आपली राजकीय निष्ठा स्पष्ट करताना राऊत यांनी “मी पहिल्यापासून आणि आजन्म बाळासाहेब ठाकरे यांचाच माणूस राहीन,” असे सांगितले. तसेच राहुल गांधी यांनी देशाच्या नेतृत्वाला नवी दिशा दिल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आपण अजिबात नाराज नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. “आमच्या काही पक्षीय भूमिका आहेत आणि त्या आम्ही ठामपणे मांडतो,” असेही त्यांनी सांगितले.















Discussion about this post