जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून खडसे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, भाजपमधील अपेक्षित नेते उपस्थित राहू शकले नाहीत, याचे आपल्याला दुःख असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
अमृत महोत्सवानिमित्त सर्व पक्षांतील नेत्यांना आपण निमंत्रित केले होते. त्यापैकी अनेकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. भाजपमध्ये तब्बल ४० वर्षे काम केल्यामुळे त्या पक्षातील अनेक नेत्यांशी आजही आपले घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे हे नेते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते येऊ शकले नाहीत, याचे दुःख असल्याचे खडसे यांनी सांगितले.
‘भाजपमध्ये आता बहुतांश नेते बाहेरून आलेले’
भाजपच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना खडसे यांनी पक्षातील बदलांवरही टीका केली. ‘आज भाजपमध्ये सुमारे ८० टक्के लोक अन्य पक्षांतून आले आहेत. त्यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांनी भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली, याची त्यांना कल्पना नाही,’ असे ते म्हणाले. ज्यांच्याकडून उपस्थितीची अपेक्षा होती, ते येऊ शकले नाहीत, याची खंत असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब जनतेसाठी आणि समाजसेवेसाठी आपण काम करत आलो आहोत. यापुढेही हा समाजसेवेचा वसा कायम ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.आपल्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन दिवसांत नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. एवढी मोठी गर्दी आपल्या कोणत्याही सभा किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमात यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती, असा दावा करत त्यांनी जनतेचे आभार मानले.














Discussion about this post