मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयाचे आभार मानले.
दिशाच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. तसेच प्रकरणाची नव्याने चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने तपास CBIकडे सोपवण्याचा निर्णय दिला.
‘आधी तपास करा, नंतर आरोपपत्र दाखल करा’
तपासादरम्यान कोणालाही थेट आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून त्यानंतर सखोल तपास करावा आणि तपासातून निष्कर्ष समोर आल्यानंतरच आरोपपत्र दाखल करावे, अशा सूचना न्यायालयाने दिल्याचे सांगण्यात आले.
नेमकं काय घडलं होतं?
दिशा सालियन यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे विविध दावे त्यावेळी करण्यात आले होते.
दिशाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी Accidental Death Report (ADR) नोंदवून तपास केला होता. पोलिसांच्या तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दिशा यांच्या वडिलांनी पोलिसांच्या या निष्कर्षावर आक्षेप घेत तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आणि नव्याने तपास करण्याची मागणी केली.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रार केली असताना एफआयआर का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने केला होता.तसेच ADR आणि पोस्टमॉर्टम अहवालाची प्रत कुटुंबीयांना इतक्या वर्षांनंतरही का देण्यात आली नाही, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. चौदाव्या मजल्यावरून पडल्याचा पोलिसांचा दावा आणि पोस्टमॉर्टम अहवालातील जखमांची माहिती याबाबतही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते.
दरम्यान, या प्रकरणात आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना राजकीय हेतूने आपले नाव गोवले जात असल्याचा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडून केला जाणार असून, पुढील तपासात नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post