जळगाव । शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय/आयुष शिक्षण व कला शिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अनेक विद्यार्थ्यांनी उशिराने अर्ज सादर केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संबंधित समित्यांमार्फत एसएमएस, ई-मेल व पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अनेक अर्जदार/विद्यार्थ्यांनी समितीशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता केलेली नाही.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी ज्या अर्जदार/विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरित संपर्क साधून आवश्यक त्रुटींची पूर्तता करावी. त्यामुळे समितीला विहित वेळेत प्रकरणांवर निर्णय घेणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगावच्या सदस्य सचिव श्रीमती नंदा श्रावण रायते यांनी केले आहे.













Discussion about this post