नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठी जीवितहानी झाली असून, आतापर्यंत ६१६ जणांचा मृत्यू, तर २,५०० हून अधिक जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये सैन्य, पोलिस आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये नेपाळमध्ये गेलेले ३२० भारतीय नागरिकही बेपत्ता असल्याने चिंता वाढली आहे. भारत सरकारकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, तिबेटमध्ये अडकलेल्या ४०० भारतीय नागरिकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. नेपाळमध्ये पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, रस्ते आणि पूल वाहून गेल्याने मदत पथकांना दुर्गम भागात पोहोचण्यात अडचणी येत आहेत.भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुन्हा पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हिमनदी फुटल्याचा प्राथमिक अंदाज
या महापुरामागे हिमनदी फुटण्याची घटना कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हिमनदीतील बर्फ, खडक आणि मातीचा मोठा ढिगारा खाली कोसळून लेंडी नदीचा प्रवाह काही काळ अडवला गेला. त्यानंतर हा नैसर्गिक अडथळा फुटताच मोठ्या वेगाने पाणी, चिखल, दगड आणि मातीचा प्रवाह खाली आला. यामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नदीच्या मार्गावरील भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. अनेक वस्त्या, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे.
महापुरामुळे ९० हजारांहून अधिक नागरिक प्रभावित झाले असून, १३ जलविद्युत प्रकल्पांमधील सुमारे ९३३ कामगार बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. त्यापैकी २५४ जणांना वाचवण्यात आले आहे. तिबेटमध्येही पुरामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण बेपत्ता आहेत.















Discussion about this post