एरंडोल । अमळनेर तालुक्यातील नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेची शाई वाजत असतानाच, एरंडोल तालुक्यातील खडके गावातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. जबलपूर परिसरातील नर्मदा नदीत पाय धुण्यासाठी गेलेला ११ वर्षीय मुलगा प्रवाहात वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पित्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, मुलगा अद्याप बेपत्ता आहे. गणेश शांताराम पाटील (वय ३६) आणि लकी गणेश पाटील (वय ११) अशी या दुर्दैवी पिता-पुत्राची नावे आहेत.
आश्रमात गेले अन् काळाचा घाला
खडके येथील पाटील कुटुंबासह गावातील काही परिवार १९ ऑगस्ट रोजी जबलपूर येथील नर्मदा नदीकाठी असलेल्या सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या आश्रमात गेले होते. नर्मदा परिक्रमा वाल्यांसाठी या आश्रमात मोफत अन्नदानाची सेवा चालते. याच धार्मिक कारणास्तव परिसरातील भाविक तिथे गेले होते.

सर्वानी नर्मदा नदीत स्नान केले आणि त्यानंतर लकी नदीच्या बाहेर आला. काही वेळाने पायाला माती लागल्याचे लक्षात आल्याने तो ती धुण्यासाठी पुन्हा नदीच्या प्रवाहाजवळ गेला.
पायाची माती धुण्यासाठी गेलेल्या लकीचा अचानक पाय घसरला आणि तो नर्मदा नदीच्या तीव्र प्रवाहामध्ये पडला. डोळ्यांसमोर मुलगा वाहून जात असल्याचे पाहताच, वडील गणेश पाटील यांनी क्षणभराचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, वडिलांना मुलापर्यंत पोहोचता आले नाही आणि दोघेही प्रवाहात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली. या शोधकार्यादरम्यान वडील गणेश पाटील यांचा मृतदेह हाती लागला आहे, मात्र ११ वर्षीय लकीचा शोध अजूनही लागलेला नाही. प्रशासनाकडून मुलाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खडके गावावर आणि विशेषतः पाटील कुटुंबावर तीव्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.















Discussion about this post