जळगाव । महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात सावदा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तांदलवाडी फाट्याजवळ संशयित होंडा अमेझ कार पकडून त्यातून ५ लाख २७ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला साठा जप्त करण्यात आला. या मालाच्या वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना २७ ऑगस्ट रोजी रात्री प्रतिबंधित गुटख्याची कारमधून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. रात्री ११ वाजून ४ मिनिटांनी संशयित कार (एमएच-१९-सीव्ही-४४४५) तेथे येताच पोलिसांनी ती थांबवली.
कारची पंचांसमक्ष झडती घेतली असता विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आली. याप्रकरणी कारचालक सारंग मुरलीधर अवचार (३१, रा. अकलूद, ता. यावल) याला अटक करण्यात आली.
बुऱ्हाणपूरमधून माल आणल्याचा दावा
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. भुसावळ आणि वरणगाव परिसरात या मालाची विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता का, तसेच या साखळीमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास सुरू आहे.
या कारवाईत प्रतिबंधित मालासह वाहन जप्त करण्यात आले असून, सावदा पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांनी ही कारवाई केली.














Discussion about this post