जळगाव । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, घरातील मंडळी उज्जैनला महाकाल दर्शनासाठी बाहेरगावी गेली होती. घराला कुलूप लावले असल्याची खात्री करूनच चोरट्यांनी मध्यरात्री साधारणपणे १.३० ते २.०० वाजेच्या सुमारास घराचे मुख्य कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश करून थेट बेडरूममधील कपाट फोडले आणि आतील सर्व मौल्यवान सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेसह ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून ठसे व इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. मात्र, श्वान पथकाने घराच्या मागील व पुढील परिसरातच घिरट्या घातल्या आणि ते त्याच परिसरात घुटमळत राहिल्याने चोरट्याचा नेमका माग काढण्यात तपास पथकाला यश आले नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद
भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी करत आहेत. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित चोरटा कैद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, याच फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा माग काढत आहेत.
शहरातील पॉश किंवा गजबजलेल्या मानल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये अशा प्रकारे बंद घरांचे कुलूप तुटण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या पोलीस गस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून लवकरात लवकर या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर चोरीला गेलेल्या ऐवजाचा अंतिम व नेमका आकडा स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.















Discussion about this post