मुंबई । आयुष्यात गोडवा आणणारी साखर आता सर्वसामान्यांच्या बजेटला कडू फटका देत आहे. साखरेच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून साखरेचा किरकोळ भाव ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या अवघ्या २० दिवसांत साखरेच्या दरात तब्बल २० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे.
काही दिवसांपूर्वी ४५ रुपये किलो दराने मिळणारी साखर आता थेट ६५ रुपयांवर पोहोचली आहे. अचानक झालेल्या या भाववाढीमुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ नेमकी कशामुळे झाली, याबाबत स्पष्टता नसल्याने बाजारात चर्चेला उधाण आले आहे.
सणासुदीत मिठाई महागण्याची शक्यता
रक्षाबंधनासह सणासुदीचा काळ जवळ आला आहे. अशा परिस्थितीत साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम मिठाईच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जात असल्याने मिठाईचे दर वाढण्याची शक्यता आहे.
याशिवाय बेकरी उत्पादने, बिस्किटे, शीतपेयांसह साखरेचा वापर होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या किमतींवरही याचा परिणाम होऊ शकतो. घरगुती वापरातील साखर महागल्याने सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
सरकारकडून साखरेच्या साठ्यावर निर्बंध
दरम्यान, साखरेच्या वाढत्या किमती आणि संभाव्य साठेबाजीच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखरेच्या साठ्यावर निर्बंध अधिक कडक केले आहेत. व्यापारी आणि कंपन्यांना साखरेचा साठा करण्याच्या कालावधीत कपात करण्यात आली आहे. पूर्वी व्यापारी आणि कंपन्यांना ३० दिवसांचा साखर साठा करता येत होता. आता हा कालावधी १५ दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. हा नियम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहे.
साखरेच्या दरातील अचानक वाढ, सणासुदीची वाढती मागणी आणि साठ्यावर घालण्यात आलेले निर्बंध यामुळे आगामी काळात साखरेचे दर आणखी वाढणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post