अमरावती : राज्याच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरू असतानाच विदर्भात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह १९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके, त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना आणि आजाद समाज पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. कर्नाटकातील बेळगाव येथील काही पदाधिकाऱ्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
नगराध्यक्षा आणि १९ नगरसेवकांच्या प्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. “दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची संपूर्ण साथ राहील,” असे शिंदे यांनी सांगितले.
बच्चू कडूंच्या कार्याचे शिंदेंकडून कौतुक
यावेळी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी बच्चू कडू यांनी सातत्याने संघर्ष केल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचा पुरावा असल्याचा दावा शिंदे यांनी केला. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेत सन्मानाचे स्थान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी स्थानिक राजकारणात परिणाम?
या प्रवेश सोहळ्यास विदर्भ आणि कर्नाटकातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात सुरू असलेली संघटनात्मक बांधणी आणि या सामूहिक पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे बळ वाढण्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.















Discussion about this post