पुणे : चाकण एमआयडीसीतील उद्योगांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधत, ‘आधी इतर राजकीय उद्योग बंद करा आणि माझ्यासोबत चर्चेला या,’ असे आव्हान दिले आहे. तसेच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी आकडेवारी सादर करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसीतील उद्योगांच्या स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. सुविधांच्या अभावामुळे सुमारे २० कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असून, त्याचा फटका दोन हजारांहून अधिक कामगारांच्या रोजगाराला बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ज्या कंपन्यांची नोंदणी झाली होती, मात्र त्या प्रत्यक्षात सुरूच झाल्या नव्हत्या, अशा कंपन्या बंद होत असल्याचे म्हटले होते. यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली.
“तुम्ही आकडे सांगा. या सरकारमध्ये आमच्याशी चर्चा करण्याची धमक आहे का? आम्ही खरे आकडे देऊ. सरकारने उत्तर देण्यासाठी समोर यावे. उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग करणे बंद करावे आणि आमच्यासमोर येऊन आकडे सादर करावेत,” असे रोहित पवार यांनी म्हटले.उद्योग आणि विकासाबाबत भाजपमधील काही आमदारांना पुरेशी माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी केला. उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करण्यास आपण तयार असून, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पुराव्यांसह आणि आकडेवारीसह मांडण्याचे आव्हान त्यांनी दिले.
‘सरकार पायाभूत सुविधा देण्यात कमी पडतंय’
राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी व्यावसायिक तयार असले, तरी सरकार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात कमी पडत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आलेल्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रातील कंपन्या बंद होण्याच्या मुद्द्यावर सरकारला घेरले.तसेच नीती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत महाराष्ट्राची विकासाच्या बाबतीत क्रमवारी घसरल्याचा दावाही त्यांनी केला. “हे मी सांगत नाही, नीती आयोग सांगत आहे,” असे ते म्हणाले.
‘राजीनामा द्या, मग पवारांवर बोला’
दरम्यान, रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. तलाठी भरतीतील कथित गैरप्रकाराबाबत आपण यापूर्वी आरोप केले होते, त्यावेळी आपल्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयीन प्रक्रियेतून गैरप्रकार सिद्ध झाल्याचा दावा करत “आधी राजीनामा द्या, त्यानंतर पवारांवर बोला,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.















Discussion about this post