जळगाव । आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी आज गुरुवारी पहाटे जिल्हाभरात ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. या धडक कारवाईत गेल्या १० वर्षांत शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या २१४ आरोपींच्या घरांची, वास्तव्याच्या ठिकाणांची आणि वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ७ गावठी कट्टे, १९ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ चाकू, २५ मोबाईल फोन आणि ३ मोटारसायकली असा एकूण ७ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणांत एकूण ७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
पहाटे ६ वाजता जिल्हाभर एकाच वेळी कारवाई
पोलिसांनी गेल्या १० वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्याआधारे लक्ष्यित यादी तयार केली होती. संबंधित आरोपींनी शस्त्रे स्वतःकडे न ठेवता मित्र, नातेवाईक किंवा परिचितांकडे लपवून ठेवली असण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा ठिकाणीही कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्यात आली.
गुरुवारी सकाळी ६ वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके एकाच वेळी रवाना करण्यात आली. त्यामुळे अनेक संशयितांच्या घरांची आणि वाहनांची अचानक झाडाझडती घेण्यात आली.
भुसावळ, वरणगावात गावठी कट्टे जप्त
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी किशोर ऊर्फ गोजऱ्या सकरू जाधव (३१) याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत राऊंड, असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर वरणगाव पोलिसांनी एका आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस, असा ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
एमआयडीसी आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
एमआयडीसी पोलिसांनी रोशन विकास पाटील (२६) याच्याकडून एक गावठी कट्टा, अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा, जप्त केला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेने राजकिरण मानसिंग परदेशी (२६) आणि रईस रफिक तांबोळी (२१) यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि दोन काडतुसे, असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चाळीसगावात दोन कट्टे, काडतुसे आणि चाकू जप्त
चाळीसगाव शहर पोलिसांनी प्रथमेश लक्ष्मण भामरे (२०) याच्याकडून दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे आणि एक चाकू, असा ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याच कारवाईत जयेश किरणसिंग राजपूत (२६) याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली. तर दीपक सुभाष मरसाळे (३०) याच्याकडून २५ मोबाईल फोन आणि तीन वाहने असा तब्बल ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘ऑपरेशन ३/२५’च्या माध्यमातून जिल्ह्यातील शस्त्र बाळगणाऱ्या आणि शस्त्रांच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या लक्ष्यित आणि माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.














Discussion about this post