जळगाव | राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी अद्याप पावसाच्या सरी कायम आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला असून, जळगाव जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
शेतीची कामे सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच डोंगराळ भाग, घाटरस्ते आणि नदी-नाल्यांच्या परिसरात प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.















Discussion about this post