मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवक व युवती संघटनांमध्ये नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे.
युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांना मुदतवाढ न देता नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली. पक्षाने यावेळी शहरी आणि ग्रामीण अशा स्वतंत्र पद्धतीने युवक-युवती संघटनांची रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार विशाल वाकडकर यांची युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मनाली भिलारे यांची शहर युवती प्रदेशाध्यक्ष आणि अमृता कालदाते यांची ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्याही राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
अलीकडेच दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पक्षातील ताज्या संघटनात्मक नियुक्त्यांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून, आगामी काळात पक्षाच्या धोरणात्मक वाटचालीबाबतही उत्सुकता वाढली आहे.















Discussion about this post