चाळीसगाव : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ व विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (२३ जुलै) चाळीसगाव तालुका बंद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती संघटनेने दिली.
आंदोलनापूर्वी प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जनजागृती केली. त्यानंतर संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करत निषेध नोंदविण्यात आला.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी संयम राखत आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.
या आंदोलनात चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप (अण्णा) कांबळे, शहराध्यक्ष सागर निकम, तालुका उपाध्यक्ष विकास बागुल, चेतन पवार, मनोज देशमुख, शाहिद शेख, गौतम निकम, हंसराज पगारे, मांगू बागुल, विकास भालेराव, जीवन जाधव, अविनाश वाघ, आबा निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासन, पोलीस विभाग, नागरिक तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.















Discussion about this post