मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रतिसाद मिळताना दिसला. काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली, तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि शांतता मोर्चे काढण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली.
अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रेल्वे स्थानक ते सिंधी कॅम्प मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
पुण्यातील वाकडेवाडी परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी पुणे–मुंबई जुन्या महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) परिसरात बंदचा परिणाम दिसून आला. ग्राहकांची संख्या अत्यल्प असल्याने भाजीपाल्याची विक्री मंदावली. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बुलढाणा शहरात सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व्यापारी व व्यावसायिकांना शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत होते. शहरात बहुतांश ठिकाणी बंद पाळण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केले.
नांदेड शहरातही सकाळच्या सत्रात अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर समविचारी पक्षांनीही सहभाग घेतला.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध, NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी करत राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. काही शहरांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी जनजीवन सुरळीत सुरू असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.















Discussion about this post