चाळीसगाव : अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून, समाजाने अशा प्रवृत्तींना बळी न पडता एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन जन आंदोलन, खान्देश विभागाचे प्रा. गौतम निकम यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रा. निकम यांनी म्हटले आहे की, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थन आणि विरोधाच्या नावाखाली अनुसूचित जातींमध्ये परस्पर अविश्वास व वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वादामागे राजकीय हेतू असून विशिष्ट मतदारसंघांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आजही पदोन्नतीतील आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा उपलब्ध नसल्याने अनेकांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सरकारी नोकऱ्यांतील संधी कमी होत असून शिक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर शाळा बंद होत असल्याने वंचित समाजासमोरील मूलभूत प्रश्न अधिक गंभीर बनत आहेत, असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींतील विविध घटकांनी परस्पर संघर्ष करण्याऐवजी रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रा. निकम यांनी स्पष्ट केले.
अनुसूचित जाती हा घटनात्मकदृष्ट्या एकच घटक असून त्यांच्यात कृत्रिम मतभेद निर्माण करणे समाजहिताचे नसल्याचे सांगत, सर्व घटकांनी परस्पर बंधुभाव जपत एकसंघ राहावे आणि राजकीय स्वार्थासाठी भावनिक ध्रुवीकरण करणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.















Discussion about this post