मुंबई | राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवासी भाड्यात 13.50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, परिवहन प्राधिकरणाच्या (STA) बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नव्या दरांची अंमलबजावणी तातडीने केली जाऊ शकते.
यंदा 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत एसटी महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढ लागू केली होती. त्यानंतर या वाढीला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपत असल्याने आता कायमस्वरूपी 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे सध्या लागू असलेल्या दरांपेक्षा प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागू शकते.
यासोबतच तिकीट दरांमध्येही महत्त्वाचा बदल सुचविण्यात आला आहे. प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी एसटी तिकीटाचे दर पाच रुपयांच्या पटीत निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा महामंडळाचा दावा आहे.
एसटी महामंडळाच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ, डिझेलच्या वाढलेल्या किमती, टायर तसेच बसच्या सुट्या भागांच्या दरात झालेली वाढ यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या आर्थिक भारामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.
दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या भाडेवाढीनंतरही एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अपेक्षित प्रमाणात सुधारलेली नाही. मे महिन्यात एसटीचे वाहतूक उत्पन्न 1,047.17 कोटी रुपये इतके होते, तर एकूण खर्च 1,096.07 कोटी रुपये झाला. राज्यातील 31 पैकी 22 विभागांना स्वतःचा खर्चही भागवता आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
याआधी जानेवारी 2025 मध्ये 14.95 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. आता नव्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राज्यभरातील एसटी प्रवाशांना पुन्हा एकदा वाढीव भाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.















Discussion about this post