मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतला असून, त्यांच्या निवडीची प्रक्रिया पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसल्याचा दावा करत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी वकिलामार्फत सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध घोषित करून ती रद्द करावी आणि स्वतंत्र निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नोटीसमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पारदर्शक आणि निःपक्षपाती पद्धतीने व्हावी, तसेच तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी अमान्य मानावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या वादावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देत सुनेत्रा पवार यांची निवड पूर्णपणे पक्षाच्या घटनेनुसार झाल्याचा दावा केला. तसेच, या नोटिशीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड आवश्यक होती, असे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पक्षातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या राजकीय चर्चांना उधाण आले असून, याप्रकरणी पक्ष नेतृत्व पुढे काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post