जळगाव । जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांदरम्यान अनिल पाटील यांनी २०१४, २०१७, २०१९ आणि २०२३ मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक गौप्यस्फोट केले.
अनिल पाटील म्हणाले की, २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण कल्पना शरद पवार यांना होती. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली तेव्हा त्याबाबत शरद पवार यांना माहिती होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वतःला या प्रक्रियेपासून वेगळे केले, असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला दिलेले समर्थन, २०१७ मध्ये शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपसोबत सत्तेत जाण्याची चर्चा आणि २०२३ मध्येही सत्तेत सहभागी होण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले. “एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होण्याच्या जवळपास महिनाभर आधी आम्हीही सरकारमध्ये जाणार होतो. त्याचीही कल्पना कदाचित शरद पवार यांना होती. मात्र त्यावेळी तो निर्णय थांबला,” असा दावा त्यांनी केला.
भाजप आणि एनडीएबाबत बोलताना अनिल पाटील म्हणाले, “या सर्व घटनांमुळे भाजप आणि एनडीएच्या मनात विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या दिवशी शरद पवार प्रत्यक्ष एनडीएमध्ये सहभागी होतील, त्याच दिवशी त्या चर्चांवर विश्वास ठेवावा.”















Discussion about this post