जळगाव | शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील एका व्यावसायिकाची तब्बल ९ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३ जून ते १० जुलैदरम्यान ही फसवणूक झाली असून, याप्रकरणी रविवारी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल टिकमदास पोपटानी (वय ४२, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांना ३ जून रोजी व्हॉट्सअॅपवर एक संदेश आला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे सांगत भामट्यांनी त्यांना एका लिंकद्वारे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून विविध गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भामट्यांनी विश्वास संपादन केल्यानंतर पोपटानी यांनी २४ जून रोजी सुरुवातीला १ लाख २५ हजार रुपये गुंतवले. काही वेळातच अॅपमध्ये ८० हजार रुपयांचा नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिकच वाढला. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ९ लाख ३५ हजार रुपये गुंतवले.
काही दिवसांनी पोपटानी यांनी अॅपमधून १० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याबाबत चौकशी केली असता, भामट्यांनी “तुम्हाला आयपीओ लागला असून ही रक्कम काढण्यासाठी आणखी ३२ लाख ९५ हजार रुपये भरावे लागतील,” असे सांगितले.यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पोपटानी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवरून येणाऱ्या गुंतवणुकीच्या आकर्षक ऑफर्सवर विश्वास ठेवू नये, अज्ञात लिंकवर क्लिक करू नये आणि कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे.















Discussion about this post