मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. खंडाळा घाट परिसरातील मिसिंग लिंक भागात रस्त्यावर दरड कोसळल्यानंतर आता मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या तातडीने रद्द केल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना बसला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–धुळे एक्स्प्रेस (11011) आणि धुळे–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (11012) या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्याने धुळे, चाळीसगाव, पाचोरा आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना ऐनवेळी गाडी रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने मोठी धावपळ उडाली. अनेकांनी एसटी बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारला, तर बसस्थानके आणि खासगी प्रवासी वाहनांवरही अतिरिक्त ताण निर्माण झाला.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस यांच्यासह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे–सोलापूर एक्स्प्रेस तसेच पुणे–लोणावळा मार्गावरील 99805 आणि 99806 या लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून अहमदाबाद–कोल्हापूर, इंदूर–दौंड, अहमदाबाद–पुणे आदी गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे. काही गाड्यांचा प्रवास नियोजित स्थानकापूर्वीच संपविण्यात आला असून, काही गाड्या पुणे, लोणावळा किंवा पनवेल येथून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.















Discussion about this post