नवी दिल्ली : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (AICTE) ने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी देशभरातील तब्बल ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय विविध संस्थांमध्ये सुरू असलेले ९५० हून अधिक तांत्रिक अभ्यासक्रमही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
महाविद्यालये बंद होण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये संयुक्तपणे अव्वल ठरली आहेत. दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी १२ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ८, पंजाब आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी ४, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी ३, तर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी २ महाविद्यालयांना टाळे लागले आहे. हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि ओडिशा या राज्यांतील प्रत्येकी एका महाविद्यालयाचाही समावेश या यादीत आहे.बंद करण्यात आलेल्या ५८ संस्थांपैकी केवळ तीन संस्था अनुदानित असून उर्वरित सर्व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
प्रवेश घटल्याने आणि नियमांचे पालन न झाल्याने कारवाई
AICTE च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये सातत्याने घट झाल्यामुळे अनेक महाविद्यालये आर्थिक अडचणीत सापडली होती. याशिवाय अनेक संस्थांकडे आवश्यक पात्रताधारक प्राध्यापकांची कमतरता होती. तसेच नियमानुसार आवश्यक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक मानके पूर्ण करण्यातही अनेक महाविद्यालये अपयशी ठरली. त्यामुळे नियामक संस्थेला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले.
सध्याच्या विद्यार्थ्यांना दिलासा
महाविद्यालये बंद होणार असल्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र AICTE ने याबाबत स्पष्ट भूमिका घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ अर्थात टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या धोरणानुसार ही कारवाई केली जात असल्याने या महाविद्यालयांमध्ये केवळ प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशांवर बंदी असेल.
दुसऱ्या, तिसऱ्या आणि अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. संबंधित विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येणार असून त्यांच्या पदवीपर्यंतची शैक्षणिक प्रक्रिया पूर्ववत सुरू राहणार आहे.














Discussion about this post