जळगाव । राज्यात विविध ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दौंड तालुक्यात औषध फवारणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात ग्राईंडर मशीनमुळे सुताराचा मृत्यू, तर परभणीत कुलरचा शॉक लागून सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला. या तिन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
औषध फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी येथील तुकाईनगर परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. मीनाबाई हरी काळे (वय ४०) या ट्रॅक्टरला जोडलेल्या औषध फवारणी यंत्राच्या टाकीत किती औषध शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टर आणि फवारणी यंत्राला जोडलेल्या फिरत्या शाफ्टमध्ये अडकला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अमळनेरमध्ये ग्राईंडर मशीनने गळा कापल्याने सुताराचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. देविदास लटकन सुतार (वय ७४) हे ग्राईंडर मशीन सुरू करत असताना मशीन त्यांच्या हातातून सटकले. त्याचवेळी मशीन त्यांच्या गळ्यावर आदळल्याने गळ्यापासून कपाळापर्यंत खोल जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कुलरचा शॉक लागून सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
परभणी तालुक्यातील पोरवड गावात कुलरचा शॉक लागून शिवराज नवनाथ गिराम (वय ६) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील कुलर सुरू असताना तो त्याच्या संपर्कात आला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या तिन्ही घटनांमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत असून, शेतीची यंत्रे, विद्युत उपकरणे आणि औद्योगिक साधने वापरताना आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.















Discussion about this post