बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी 2026 ची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा एकूण 6,715 रिक्त पदांसाठी भरती होणार असून, इच्छुक उमेदवारांना 21 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
मागील वर्षापेक्षा मोठी वाढ
गेल्या वर्षी IBPS PO भरतीअंतर्गत 5,208 पदे उपलब्ध होती. यंदा रिक्त पदांची संख्या वाढून 6,715 झाली असून, बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
11 सार्वजनिक बँकांमध्ये मिळणार संधी
या भरतीद्वारे देशातील 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा बँक ऑफ बडोदा (1,900), कॅनरा बँक (1,500), बँक ऑफ महाराष्ट्र (1,100) आणि पंजाब नॅशनल बँक (504) येथे उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
मुख्य परीक्षेच्या स्वरूपात बदल
यंदाच्या भरती प्रक्रियेत मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या 145 वरून 170 करण्यात आली आहे. मात्र, एकूण गुण आणि परीक्षेचा कालावधी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निबंध आणि आकलनाचा वर्णनात्मक (Descriptive) पेपर पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
परीक्षा कधी होणार?
IBPS PO ची प्राथमिक परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2026 मध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
अर्ज शुल्क आणि वेतन
SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर सर्वसाधारण, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना भत्त्यांसह 48,480 रुपये मूलभूत वेतन देण्यात येणार असून, इतर सेवा लाभही लागू राहतील.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करावीत.















Discussion about this post