जळगाव | चाळीसगाव येथे रविवारी झालेल्या जनआक्रोश धरणे आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात पोलीस उपनिरीक्षकाबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी प्र.चा. (ता. चाळीसगाव) येथील किसनराव जोर्वेकर यांच्याविरुद्ध २७ जून रोजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी चाळीसगाव शहरात पोलीस प्रशासनाविरोधात जनआक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थितांना संबोधित करत पोलीस प्रशासनावर टीका केली. मात्र, भाषणादरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी कथितरीत्या अवमानकारक व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोपनीय शाखेचे अंमलदार योगेश दिलीप बेलदार यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, सार्वजनिक व्यासपीठावरून करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांची उपस्थित जनसमुदायासमोर बदनामी झाली असून, त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३५२ आणि कलम ३५६ (३) अंतर्गत अदखलपात्र (NCR) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची एनसीआर क्रमांक ०६१३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. संबंधित घटना २८ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घडल्याची नोंद असून, त्याच दिवशी रात्री जनरल डायरीमध्येही नोंद करण्यात आली.
अदखलपात्र गुन्हा असल्यामुळे या प्रकरणात तात्काळ अटक किंवा नियमित गुन्ह्याप्रमाणे तपासाची प्रक्रिया होत नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित पक्ष न्यायालयात दाद मागू शकतो आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते.
दरम्यान, माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी उन्मेश पाटील यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, त्यांच्या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.















Discussion about this post