जळगाव । येथील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सील केलेल्या घरात शिडी लावून घुसखोरी केल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील बंद घरात हा प्रकार घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांचे जळगावातील गणेश कॉलनीतील घर ‘एसीबी’ने सील केले होते. मात्र, या सीलबंद घरात चॅनल गेटचे कुलूप तोडून आणि शिडी लावून दोन जणांनी आत घुसखोरी केली. दरम्यान, या सीलबंद घरातून काही संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती जागरूक शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच ‘एसीबी’ आणि जिल्हापेठ पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुख्य चॅनल गेटचे कुलूप तोडून, शिडीच्या साहाय्याने घरात शिरलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रसाद नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे लाचखोर लोकसेवक किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डायरी आणि हिशोब गायब करण्याचा होता डाव?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, घरातील महत्त्वाची कागदपत्रे, संपर्क क्रमांक आणि आर्थिक हिशोबाची नोंद असलेली ‘डायरी’ लांबवण्यासाठीच हा घरफोडीचा प्रयत्न केला गेला होता का? घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू एसीबीच्या कारवाईपूर्वी हटविण्याचा कट होता का?, या सर्व बाजूंचा विचार करून जळगाव पोलीस आता पुढील सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे लाचखोरीच्या प्रकरणात आता एक नवीन आणि गंभीर वळण आले आहे.















Discussion about this post