नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या फेरवाटपावर निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून काही विद्यमान मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असून, त्यांच्याकडून शिक्षण खाते काढून घेतले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची चर्चा आहे. नितीन गडकरी यांच्याकडे अतिरिक्त किंवा नवी जबाबदारी दिली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पंजाबला अधिक प्रतिनिधित्व?
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंजाबला मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या जागी पंजाबमधील किंवा शीख समाजातील दुसऱ्या नेत्याला संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
शक्तिकांत दास आणि श्रीकांत शिंदे यांच्याबाबतही चर्चा
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सध्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे. त्यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे काही माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांचाही मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या सर्व चर्चा अद्याप अधिकृतरीत्या सरकारकडून किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post