सांगली | सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाला शनिवारी मिरजजवळ भीषण अपघात झाला. रत्नागिरी–नागपूर महामार्गावर झालेल्या या अपघातात आमदार गाडगीळ यांच्यासह वाहनातील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले असून एका दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुधीर गाडगीळ हे कर्नाटकातील उगार येथून सांगलीकडे परतत असताना मिरज परिसरातील रत्नागिरी–नागपूर महामार्गावर त्यांच्या चारचाकी वाहनाचा दुचाकीला धक्का लागला. या धडकेत वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच त्यांचे वाहनचालक, स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षक यांनाही किरकोळ मार लागला असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण काय, याचा पुढील तपास सुरू आहे.














Discussion about this post