जळगाव । गेल्या एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवेळी आणि अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपयांची भरीव मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्य शासनाने २५ जून २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून,जळगाव जिल्ह्यातील १४ हजार ३६० बाधित शेतकरी आणि ७ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान या मदतीत समाविष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामागे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतर आमदारांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्राप्त होताच पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे वेळोवेळी बैठका व पत्रव्यवहार करून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी लावून धरली होती.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, कृषी विभागाने शासनाकडे नुकसान अहवाल सादर केला होता. त्याला यश मिळत राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी एकूण १०६ कोटी ५६ लाख ४८ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली असून जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपये मदत मंजुर करण्यात आली आहे.
“अवकाळी पावसामुळे माहे एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि संबंधित विभागांकडे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह त्या-त्या भागातील आमदारांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या संदर्भात माननीय कृषिमंत्री व माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बैठका देखील झाल्या. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतीच्या पुढील कामांसाठीही मदत होणार आहे. मंजूर निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून प्रशासनाने त्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी.”
– पालकमंत्री गुलाबराव पाटील















Discussion about this post