जळगाव । राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिस विभागात मोठे प्रशासकीय फेरबदल करत २२४ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर तात्पुरती पदोन्नती दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर ३ नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांच्या बदल्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सुनिल रामराव पाटील यांचा समावेश असून त्यांची चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे चोपडा उपविभागाला नवीन नेतृत्व मिळाले आहे.
जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनाही पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय), जळगाव या पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ जिल्हा पोलिस दलाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी प्रमोद वाघ यांची मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या उपविभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाली आहे.
यांची बदली
याच आदेशान्वये जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नाशिक येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये बदली करण्यात आली आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत कार्यरत असलेले डीवायएसपी ब्रम्हदेव शेळके यांची कळवण उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.















Discussion about this post