मुंबई । जर तुमच्या घरात किंवा नात्यात कोणाचे लग्न ठरले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील बालविवाहांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता एक मोठा आणि कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमानुसार, आता लग्नपत्रिकेवर केवळ वधू-वराचे नाव छापून चालणार नाही, तर त्यांच्या नावापुढे त्यांची अधिकृत जन्मतारीख आणि वय लिहिणे कायदेशीररीत्या बंधनकारक असणार आहे.
राज्यात बालविवाहाची अत्यंत चिंताजनक आकडेवारी समोर आल्यानंतर सरकारने हे कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका सरकारी अहवालानुसार, एकट्या परभणी जिल्ह्यात तब्बल ४८ टक्के मुलींचे विवाह हे अल्पवयातच (कायदेशीर वय होण्यापूर्वी) झाल्याचे उघडकीस आले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता, बालविवाहांना सुरुवातीलाच चाप लावण्यासाठी थेट लग्नपत्रिकेवरच कडक नियम आणण्याची तयारी सुरू आहे.
राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी
लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीचे नाव, जन्मतारीख आणि वय टाकण्याचा हा नाविन्यपूर्ण आणि कडक नियम सर्वात आधी राजस्थान सरकारने लागू केला होता. तिथे या प्रयोगाला मिळालेले यश आणि त्याचा झालेला फायदा लक्षात घेऊन, आता महाराष्ट्र सरकारही याच निर्णयाचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नियमामुळे लग्नपत्रिका पाहताच वधू-वराचे वय कायदेशीर आहे की नाही, हे स्पष्ट होईल आणि छुप्या पद्धतीने होणाऱ्या बालविवाहांना मोठा आळा बसेल.
बालविवाह कायदा नेमका आहे तरी काय?
देशातील ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’ नुसार लग्नासाठी मुलीचे वय किमान १८ वर्षे आणि मुलाचे वय किमान २१ वर्षे असणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. जर कोणी या कायद्याचे उल्लंघन करून बालविवाह घडवून आणला किंवा त्याला मदत केली, तर त्याला दोन वर्षांपर्यंतची सक्त मजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
यामध्ये केवळ लग्न लावणारे नव्हे, तर लग्नाचा सोहळा पार पाडणारे (उदा. पुरोहित, काझी), लग्न ठरवणारे आई-वडील, नातेवाईक आणि लग्नाला उपस्थित राहून प्रोत्साहन देणारे लोक यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो.















Discussion about this post