जळगाव । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएममधील रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणारे चोरटे पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तोलकाटा परिसरातील सुप्रीम कॉलनी येथे असलेल्या एसबीआयच्या एटीएमला मंगळवारी पहाटे लक्ष्य करण्यात आले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून आलेल्या दोन संशयितांनी एटीएम केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीनचा रोख रक्कम ठेवण्यात येणारा भाग कापण्यास सुरुवात केली.
दरम्यान, एटीएममध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींचा अलर्ट बँकेच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाला. ही माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचविण्यात आली. सूचना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांची गाडी परिसरात पोहोचत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न अर्धवट सोडून पलायन केले.
घाईघाईत पळ काढताना संशयितांनी गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर साहित्य तेथेच टाकून दिले. मशीन कापण्याच्या प्रयत्नात कॅश ट्रेमधील काही चलनी नोटांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
विशेष बाब म्हणजे, याच एटीएममध्ये यापूर्वीही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ठिकाणावर चोरट्यांची पुन्हा नजर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला जात आहे. तसेच घटनास्थळी आढळून आलेल्या वाहनासंदर्भातील धागेदोरेही पोलिस तपासत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच चोरट्यांचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.















Discussion about this post