भुसावळ । भुसावळ शहरालगत वरणगाव महामार्गावरील एका वॉटर पार्कसमोर २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भूषण उल्हास व्हावले (रा. गांधीनगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव असून, आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा तपास सुरू आहे. याप्रकरणी संजय ऊर्फ संजू आवटे आणि प्रमोद बलराम लावरिया या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अफसर मेमन हा संशयित पसार आहे.

गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. बीएचे शिक्षण पूर्ण केलेला भूषण गेल्या दोन वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होता. या आर्थिक व्यवहारावरून त्याचा संजय आवटे याच्याशी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

पैशांच्या व्यवहारावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी भूषणला वारंवार फोन येत होते. त्यानंतर तो घराबाहेर पडला. त्याची आईदेखील त्याच्यासोबत साकरी फाटा परिसरातील संजय आवटे याच्या फार्महाऊसवर गेली होती. तेथे पैशांच्या परतफेडीचा विषय निघाल्यानंतर भूषणच्या आईने पैशांची व्यवस्था करून देण्याचे सांगितले. तसेच आपण फार्महाऊसवर आल्याची माहिती तिने फोनद्वारे पतीला दिली.
रात्री फार्महाऊसवरच थांबला
बुधवारी रात्री भूषण फार्महाऊसवरच थांबला होता. आपण जेवण करत असल्याचा निरोपही त्याने फोनवरून दिला होता. मात्र, गुरुवारी सकाळी वरणगाव महामार्गावरील वॉटर पार्कसमोर त्याचा मृतदेह आढळला. बुधवारी फार्महाऊसवर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
भूषणचा भाऊ विशाल उल्हास व्हावले याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संजय ऊर्फ संजू आवटे आणि प्रमोद बलराम लावरिया यांना अटक करण्यात आली आहे, तर अफसर मेमन याचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. आर्थिक व्यवहारातून नेमका काय वाद झाला, तरुणाचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.














Discussion about this post