जळगाव। जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटून गेला तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाची पेरणी पूर्णपणे रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटाच्या छायेत सापडला असून, त्याच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे.
पूर्वतेयारी झाली, पण पावसाने दडी मारली
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासूनच शेताची मशागत, नांगरणी आणि कुळवणी करून ठेवली होती. २५ मे रोजी रोहिणी तर ७ जून रोजी मृग नक्षत्राची सुरुवात झाली. मात्र, परंपरेने पेरणीचा काळ मानल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांची निराशा केली. आता २२ जूनपासून ‘आर्द्रा’ नक्षत्राला सुरुवात होत असून, या काळात तरी वरुणराजा बरसेल का? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. जर पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे बागायती शेतकऱ्यांचा आधार, कोरडवाहू शेतकरी हवालदील.
पाणी पिण्यासाठी राखीव!
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई भीषण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेतीसाठी अतिरिक्त आवर्तने सोडली जाणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर केवळ पावसाचाच एकमेव पर्याय उरला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोअरवेलची सोय आहे, त्यांनी कसाबसा पेरणीचा श्रीगणेशा केला आहे. परंतु, पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर “पेरणी करावी की आणखी थांबावे?” असा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.















Discussion about this post