मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा अखेर तब्बल २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवानदार यांनी निकालाचे वाचन करताना लोकनेत्याची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी दोन दशकांचा कालावधी लागल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
सीबीआयने सादर केले होते १२७ साक्षीदारांचे जबाब
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कळंबोली पोलिसांकडे होता. मात्र तपासाबाबत आक्षेप घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने १२७ साक्षीदारांचे जबाब, कॉल डेटा रेकॉर्ड (CDR), बॅलेस्टिक अहवाल आणि इतर पुरावे न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणातील आरोपी पारसमल जैन याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते आणि संपूर्ण खटल्याची मदार त्याच्या साक्षीवर असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
निकाल देताना न्यायालयाने पारसमल जैन यांच्या साक्षीतील विसंगतींकडे लक्ष वेधले. त्यांना अधिकृत अटक न दाखवता ताब्यात ठेवण्यात आल्याचा तसेच दबावाखाली कबुली घेतल्याचा मुद्दा न्यायालयाने गंभीर मानला. सुरुवातीच्या कबुलीजबाब आणि नंतरच्या निवेदनात मोठी तफावत असल्याने त्यांची साक्ष विश्वासार्ह मानता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
राजकीय वैमनस्याचा आरोप, मात्र पुरावे अपुरे
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार २००२ पासून पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात राजकीय आणि वैयक्तिक मतभेद निर्माण झाले होते. या वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे दोष सिद्ध होत नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
२० वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष
पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेली दोन दशके न्यायासाठी सातत्याने लढा दिला. प्रत्येक सुनावणीला कुटुंबीय न्यायालयात उपस्थित राहत होते. अखेर २० वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल जाहीर झाला.
काय होते प्रकरण?
३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काजी हे मुंबईहून उस्मानाबाद (सध्याचे धाराशिव) येथे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या हत्याकांडाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती.















Discussion about this post