जळगाव । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मतदारसंघातील वाघ नगर आणि माऊली नगर परिसरात गेल्या १५ दिवसांतून केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्यात आला.
१५ दिवसांत फक्त अर्धा तास पाणी! महिलांची पाण्यासाठी वणवण
वाघ नगर आणि माऊली नगर परिसरातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पंधरा दिवसांतून एकदा आणि तेही अवघा अर्धा तास पाणी येत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रणरणत्या उन्हात मैलोन्मैल वणवण भटकावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
आधी निवेदने, आता थेट हंडा मोर्चा!
स्थानिक नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलनं केली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली; मात्र प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर प्रशासनाच्या या सुस्त कारभाराविरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’ने आक्रमक पवित्रा घेत महिलांच्या सोबतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकावला.मोर्चामध्ये शेकडो महिला हातात रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनकर्त्यांनी थेट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरच निशाणा साधला. “राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या मतदारसंघात जर जनतेला थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल, तर ही अत्यंत लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे. मंत्र्यांच्या मतदारसंघातच ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा घणाघाती आरोप आंदोलकांनी केला.















Discussion about this post